
हिन्दुस्थानाला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी सत्याहत्तर वर्षे उलटून गेली. तरी पण हिन्दुसमाज मनानें पूर्णतः परतंत्रच आहे. कर्तृत्ववान, शीलवान, धैर्यवान, साहसी, त्यागी, संयमी, प्रखर स्वदेशाभिमानी व स्वधर्माभिमानी उगवत्या तरुणांची पिढी, ही राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ति आहे. या कसोटीवर हिन्दुस्थान आजही दरिद्रीच आहे. सध्याच्या अध:पतित अवस्थेतून उगवत्या तरुण पिढीला ध्येयवादी बनविण्यासाठी, पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवप्रभूंच्या अति स्फूर्तिप्रेरणादायक जीवनाचा न पुसला जाणारा खोल ठसा त्यांच्या चित्तांत उमटविणें अत्यंत अत्यावश्यक आहे. श्रीशिवछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी ही राष्ट्राची क्रमांक एकची निकडीची गरज आहे. यासाठीं श्रीशिवप्रभूंच्या पदस्पर्शानें पुनित झालेल्या व अनेक हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानानें धारातीर्थे बनलेल्या, गडकोटांच्या मोहिमा, प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात. मृतवत् अंत:करणाची हिन्दुसमाजांतील तरुण पिढी, ध्येयवादी बनविण्याचा, मोहिम हा एक अत्यंत प्रभावी असा मार्ग आहे. यातून उध्वस्त हिन्दुसमाजाचा संसार दुरुस्त करणारी, अदम्य इच्छाशक्तीची व उत्तुंग आकांक्षेची, प्रखर देशभक्त, धर्मभक्त व स्वातंत्र्यभक्त ध्येयवादी तरुण पिढी घडावीं, हैं एकमेव लक्ष्य आहे. हें पवित्र व उदात्त उद्दिष्ट लक्षांत घेऊनच हरेक तरुणानें मोहिमेंत यावें, ही श्रीशिवछत्रपतींची अपेक्षा आहे.